क्लिक करा

गणेशपूजनातील २१ पत्री व श्री बाप्पाच्या सोळा विविध स्वरूपाचे ध्यान

  • Home
  • पूजा
  • गणेशपूजनातील २१ पत्री व श्री बाप्पाच्या सोळा विविध स्वरूपाचे ध्यान
Ganesh Chaturthi

❓गणेशपूजनातील २१ पत्री कोणत्या ?
❓श्री बाप्पाच्या सोळा विविध स्वरूपाचे ध्यान कोणते
❓शुभकार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?
❓श्री गणेशाला दुर्वा प्रिय का?

गणेशपूजनातील २१ पत्री

१. अगस्ती(हादगा)

अगस्तीची म्हणजेच हादग्याची पाने (Sesbania Grandiflors). प्राचीन ग्रंथांमध्ये नेत्रविकारांवर अगस्तीचे प्रयोग सापडतात. जीवनसत्त्व ‘अ’ हे दृष्टीला पोषक असतेत्या जीवनसत्त्वाचे वनस्पतिज रूप अर्थात बीटाकॅरोटिन हे तत्त्व अगस्तीच्या पानांमध्ये ४५००० यूजी- एवढय़ा प्रचंड प्रमाणात, म्हणजे गाजरापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात असते.

२. अर्जुन

अर्जुनपत्रे (Terminallia Arjuna). अर्जुन हा वृक्ष त्याच्या हृदयपोषक गुणधर्माबद्दल प्रसिद्ध आहे. ‘अर्जुनारिष्ट’ हे हृदयावरील औषध प्रसिद्ध आहेच. अर्जुनामध्ये मुबलक प्रमाणात असणार्‍या नैसर्गिक कॅल्शिअममुळे अर्जुनाच्या सेवनाने हाडे हस्तिदंताप्रमाणे मजबूत होतात, अशी आयुर्वेदाची मान्यता आहे.

३. आघाडा

अपामार्ग म्हणजे आघाडा (Achyranthus Aspera). आघाड्याचे बरेचसे गुणधर्म हे स्त्रियांसाठी-स्त्रीरोगांवर, विशेष उपयुक्त असे आहेत.

४. कण्हेर

करवीर म्हणजे कण्हेर (Nerium Odorum). हिचा उपयोग तारतम्याने करतात, कारण कण्हेरीच्या विषबाधेने हृदय व श्वसनक्रिया बंद पडून आकडी येऊन तोंड वेडेवाकडे होते.

५. केवडा

केवड्याची पाने. (PendenusTectoritus). केवड्याच्या फुलाच्या रसामध्ये तयार केलेले तूप सेवन केल्यास ते मूत्रविकारावर उपयोगी पडते. दीर्घकालीन डोकेदुखीमध्ये किंवा इतर शिरारोगांमध्ये केवड्याचा लेप लावला जातो.

६. जातिपत्र

जातिपत्रे अर्थात जाईची पाने (Jasminum Oriculatum). जाई व्रणरोपक आहे. एखादा बरा न होणारा व्रण (जखम) जाईच्या पानांच्या काढ्याने धुऊन, त्या जखमेवर ठेचलेली पाने लावली असता जखम बरी होते.

७. डाळिंब

दाडिमपत्रे अर्थात डाळिंबाची पाने (Punica Granatum). चवीला आंबट असूनही पित्तशामक असलेल्या निवडक फळांमध्ये आवळ्याबरोबर डाळिंबाचा समावेश होतो. डाळिंब आतड्याच्या रोगांवरचे गुणकारी औषध आहे. मुळाची साल ही कृमिघ्न आहे; विशेषत टेपवर्मचा (चपटय़ा कृमीं) त्रास याने नाहीसा होतो. उपलब्ध औषधे: दाडिमावलेह, दाडिमाष्टक चूर्ण. लहान मुलांना होणार्‍या जंत, जुलाब यांसारख्या आजारांमधील डाळिंबाची उपयुक्तता सर्वमान्य आहे.

८. डोरली

बृहतीपत्रे म्हणजे डोरलीची पाने (Solanum Indicum). डोरलीसारखे रूप असणार्‍या रिंगणीच्या फळांचा व बियांचा धूर तोंडामध्ये घेतल्यास दंतकृमींचा त्रास कमी होतो, दातदुखी कमी होते आणि दात किडण्याची प्रक्रिया थांबते.

९. तुळस

तुळशीची पाने (Ocimum Sanctum), तुळशीचा सर्वप्रसिद्ध गुणधर्म म्हणजे तुळस ही सर्दी-कफ-तापावरचे प्रभावी औषध आहे. पावसाळ्याच्या दिवसात तर घरामध्ये तुळस असायलाच हवी, इतकी तुळस त्या दिवसांमधील विविध आजारांवर उपयुक्त आहे. गजकर्ण (रिंगवर्म) या त्वचाविकारावर तुळशीचा रस लावल्यास फायदा होतो.

१०.दूर्वा

दूर्वा (Cynodon Dectylon). गणपती हे तेज (उष्ण) तत्त्वप्रधान दैवत आहे आणि उष्णतेचे शमन करणारी एक प्रमुख वनस्पती म्हणजे दूर्वा. आयुर्वेदात वर्णिलेल्या पित्तशामक वनस्पतींमध्ये दूर्वा हे एक आद्य औषध आहे.

११.देवदार

चरकसंहितेमधील अनेक रोगांवरील औषधी-प्रयोगांमध्ये देवदाराचा (Pinus Deodora) समावेश आहे. देवदाराच्या झाडाला सुरदारू असेसुद्धा म्हटले जाते.

१२.धोत्रा

धत्तूरपत्र म्हणजे धोत्र्याची पाने (Datura Stramonium) हे श्वसनविकारावरील एक प्रभावी औषध आहे. परंतु धोत्र्याचा विषारी गुण योग्य-पर्याप्त मात्रेमध्ये वापरल्यासच औषधासारखा उपयोगी पडतो; अन्यथा घातक होऊ शकतो.

१३.पिंपळ

अश्वत्थ पत्रे अर्थात पिंपळाची पाने (Phycus Religiosa). पिंपळ हा भारतातील अतिशय प्राचीन असा वृक्ष आहे; ज्याचे संदर्भ आयुर्वेदच नव्हे तर ऋग्वेदामध्येही सापडतात. संपूर्ण समाजाच्या आरोग्याची काळजी घेणार्‍या पिंपळासारख्या वृक्षांची लागवड आणि जतन करण्याची आठवण गणेशपूजनाच्या निमित्ताने करून देण्यात आलेली आहे.

१४.बेल;

बेलाची पाने (Aegle Marmelos. बिल्व या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती आतड्यांच्या आजारांवरील एक उत्तम औषध आहे. बेलाची तयार औषधे : बिल्वादी चूर्ण, बिल्वावलेह, बेल-मुरांबा, इत्यादी.

१५.बोर

बदरीपत्र म्हणजे बोरीची पाने (Zizyphus Vulgaris). बोराच्या बीचे चूर्ण पाण्याबरोबर घेतल्यास सारखी खा-खा होण्याचा आजार कमी होतो. बोराच्या पानांची चटणी तांदुळाच्या कांजीबरोबर घेतल्यास माणसाचा लठ्ठपणा कमी होतो.

१६.मरवा

मरुपत्र म्हणजे मरव्याची पाने (Origanum Margorana). मरवा अतिशय आल्हाददायक सुगंधी असतो. शरीराच्या कार्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे हार्मोन्स तयार करणार्‍या सर्व अंतस्रावी ग्रंथींची राणी समजल्या जाणार्‍या पियूषिका ग्रंथीला उत्तेजना देण्याचा नैसर्गिक सुगंधाहून दुसरा सोपा उपाय नाही, असे आयुर्वेद म्हणतो.

१७.मधुमालती

मधुमालती म्हणजे मालती किंवा चमेली (शास्त्रीय नाव – Jasminum Grandiflorum). ही पत्री प्रामुख्याने मुखरोगांवर उपयुक्त वनस्पती आहे. .

१८.माका

भृंगराजपत्र अर्थात माक्याची पाने (Eclipta Alba) माक्याचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे ‘केश्य गुणधर्म’. केसांची वाढ आणि रंग या दोन्ही पातळ्यांवर तो उपयोगी ठरतो.

१९.रुई

अर्कपत्रे म्हणजे रुईची पाने. (Calotropis procera.) रुई उत्तम कफनाशक औषध आहे. एकंदरच शरीरातील विविध ग्रंथींना उत्तेजना देऊन त्यांचे कार्य सुधारणारे आणि पर्यायाने शरीराचा चयापचय निरोगी करणारे असे हे औषध आहे.

२०.विष्णुक्रान्ता

विष्णुक्रान्ता म्हणजे शंखपुष्पी (Evolvulus Alsinoides). बुद्धि-स्मृतिवर्धक म्हणून सुप्रसिद्ध असणारी ही शंखपुष्पी, बुद्धीवर आलेले मांद्याचे विघ्न दूर करते.

२१.शमी

शमीची पाने (Prosopis Spicigera). शमी हा शब्द ‘शमयति रोगान् इति’ म्हणजे रोगांचे शमन करणारी ती शमी असा तयार झालेला आहे.

शुभकार्यारंभी श्री गणेशाचे पूजन का केले जाते?

गणपति हा दहा दिशांचा स्वामी आहे. त्याच्या अनुमतीविना इतर देवता पूजास्थानी येऊ शकत नाहीत. गणपतीने एकदा दिशा मोकळ्या केल्या की, ज्या देवतेची आपण पूजा करत असतो, ती तेथे येऊ शकते; म्हणून कोणतेही मंगल कार्य किंवा कोणत्याही देवतेची पूजा करतांना प्रथम गणपतीचे पूजन करतात.

गणपति वाईट शक्तींना पाशाने बांधून ठेवत असल्याने त्याच्या पूजनामुळे शुभकार्यात येणारी विघ्ने दूर होतात.

गणपतीने मानवाच्या नादभाषेचे देवतांच्या प्रकाशभाषेत रूपांतर केल्यामुळे आपल्या प्रार्थना देवतांपर्यंत पोहोचतात.

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।

निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा ।।

याचा अर्थ आहे, वाकडी सोंड असलेला, मोठ्या देहाचा, कोटीसूर्याप्रमाणे कांती असलेला, अशा हे देवा, तू मला सर्वदा सर्व कार्यांत निर्विघ्न कर.

श्री गणेशाच्या या ध्यानमंत्रामध्ये त्याच्या गुणवैशिष्ट्यांचे वर्णन आहे.

गणपति हे श्री गणेशाचे एक नाव आहे. ‘गणपति’ हा शब्द ‘गण’ आणि ‘पति’ या दोन शब्दांनी बनला आहे.

जपसंख्या 1764 काही 176 संख्या हवं 17 तर्पण एक अर्चन व 21

 रोगशांतीकरिता सहस्त्रनामाच्या 1000 पाठ अनुष्ठान

कोणत्याही प्रकारचे गृहदोष, ग्रह दोष, वास्तुदोष, पितृदोष, तंत्रदोष, ज्ञात-अज्ञात दोष, बंधन इत्यादी सर्वांचे निवारण श्री गणेश सहस्त्रनामावलीच्या नित्य पठणाने हळूहळू व्हायला लागते होते.

नित्य या सहस्त्रनाम स्तोत्र चा पाठ करणाऱ्यास दीर्घायू आरोग्य कुलीनता, विमल, यश व संपत्ती दुसऱ्यांवर उपकार दुसऱ्यांना मदत करण्याची ओढ, उत्तम वक्तृत्व, लोकप्रियता, प्रसिद्धी, तेजस्विता, वंशवृद्धी, उत्तम गृहसौख्य प्राप्त होतात.

। यं यं चिंतयेति। 

। तं तं प्राप्नोती निश्चितम्।।

जे जे मनात योजले चिंतले असेल, जेजे गुण रूपाने अभिमत असेल ते ते श्री गणेश सहस्त्रनाम स्तोत्र उपासकास श्री गणेश देतात.

निष्कामतया म्हणजे चित्तशुद्ध्यर्थ सहस्त्रनाम जपकास, योगसिद्धी, ज्ञान, वैराग्य, निरंतर, आनंद आणि ब्रह्म होऊन जन्म मरण  नोकरी, धनप्राप्ती, विवाह, इच्छित कार्यसिद्धी, अशा अनेक असंख्य अडचणींवर सहस्त्रनाम उपयुक्त आहे.

मुद्गलपुराण आणि रुद्रायामालतंत्र या गणपती सहस्त्रनामावली बाजारात सहजच मिळून जाईल.

 श्री बाप्पाच्या सोळा विविध स्वरूपाचे ध्यान

              मुद्गल पुराण)

गणपतिषोडशध्यान – अर्थ:  गणेशाच्या सोळा ध्यानप्रकारांचे वर्णन…

ज्याच्या कृपाप्रसादाने धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष प्राप्त होतात त्या षोडशात्म विघ्नराजाचे सोळा ध्यान प्रकार मुद्गल पुराणात वर्णिले आहेत.

या सोळा ध्यानप्रकारांची म्हणजेच गणपतिषोडशध्यानांची नावे :

१) बाल,

२) तरुण,

३) भक्त,

४) वीर,

५) शक्ती,

६) ध्वज,

७) सिद्धी,

८) उच्छिष्ट,

९) क्षिप्र,

१०) हेरंब,

११) लक्ष्मी,

१२) महान्,

१३) विघ्न,

१४) विजय,

१५) कल्पहस्त,

१६) ऊर्ध्व.

या वैशिष्टपूर्ण सोळा ध्यानांचे वर्णन मूळ संस्कृत श्लोकात असुन त्याचा मराठीतुन अनुवाद दिलेला आहे :

 (१) ज्याच्या हातात केळी, आंबा, ऊस, मोदक असून जो बालसूर्याप्रमाणे कांतिमान आहे, त्या बाल गणेशाला मी वंदन करतो.

 (२) पाश, अंकुश, अनारसा, कवठ, जांभुळ, तीळ, मोदक आणि कमल आपल्या हातात धारण करणा-या तरुण अरुणाप्रमाणे कांतिमान असणारा तरुण गणेश आमचे नेहमी रक्षण करो.

(३) नारळ, आंबा, केळ, गूळ, पायस धारण करणा-या, शरदऋतूंतील चंद्राप्रमाणे कांतिमान भक्त गणाधिपताला मी भजतो.

 (४) वेताळ, शक्ती, धनुष्यबाण, चर्म, खङग, खट्वांग, मुद्.गर, गदा, अंकुश, नाग, पाश, शूल, परशू व ध्वज धारण करणा-या वीर नावाच्या अरुण गणेशचे मी स्मरण करतो.

 (५) बसलेल्या देवीला आलिंगण देऊन, एकमेकांच्या कमरेला स्पर्श करणा-या, संध्याकालीन अरुणाप्रमाणे असणा-या, पाश धारण करुन भय दूर करणा-या शक्ती गणेशाचे मी स्तवन करतो.

 (६) पुस्तक, दंडकमंडलु, स्त्री आणि विघ्ने दूर करणारी भूषणे हाती धारण करणा-या चंद्राप्रमाणे कांती असलेल्या चतुर्मुख ध्वज गजाननाचे जो स्मरण करतो तो धन्य होय.

 (७) कमळ, आंबा, पिकलेल्या मंजरी, उसाचे कांडे (इक्षुदंड), तीळ, मोदक व परशू धारण करणा-या श्रीसमृद्धियुक्त सिद्धी गणेशाला नमस्कार असो.

 (८) तीळ, कमळ, डाळिंब, वीणा, माळ धारण करणारा उच्छिष्ट नावाचा मोक्ष देणारा गणेश आमचे रक्षण करो.

(९) रक्तवर्ण विनायक आमची विघ्ने दूर करो. जो तांबड्या फुलाप्रामणे सुंदर अंगकांतीचा आहे, तो क्षिप्र नामक गणेश ध्यान करण्यास योग्य आहे.

 (१०) अभयवरदहस्त, पाश, दन्त, अक्षमाला, परशू, मुद्.गर, व मोदक हाती घेणारा आणि ज्याने सिंहाला नमविले आहे, जो पंचवक्त्र आहे, तो हेरंब नामक गणेश आमचे रक्षण करो.

 (११) शुक्र, बीजापूर, कमह, माणिक्यकुंभ, अंकुश, पाश, कल्पकता यांनी शोभणारा, श्यामल कमळाने युक्त, आणि ज्याच्याजवळ दोन देवी आहेत तो गौरांग लक्षमीगणेश आमचे रक्षण करो.

 (१२) कल्हार, कमळ, बीजापूर, गदा, मणिकुंभ, शाली, पाश व चक्र यांनी युकत, सुंदर कमळ धारण करणा-या तसेच गौरांगी देवी नेहमी जवळ असलेला असा रक्तवर्ण महान् गणेश आमचे सतत कल्याण करो.

 (१३) शंख, चाप, पुष्प, कुठार, पाश, चक्र, अंकुश, मंजरी ज्याच्या हातात आहेत, जो सर्व भूषणांनी संपन्न आहे, तो सुवर्ण कांतिमान् विघ्नगणेश विजयी असो.

 (१४) पाश, अंकुश, अपूप आणि कु-हाड ज्याच्या हातात आहेत, ज्याची एक अंगुली चंचल सोंडेवर आहे, त्या पिवळया रंगाच्या कल्पवृक्षाच्या खाली बसलेल्या विजय गणेशाची मी सेवा करतो.

 (१५) कल्पलता हाती असलेला, दोन रक्तकुंभांनी उजळलेला, पाश-अंकुश-फलधारी, मूषकवाहन कल्पहस्त गणेश आमचे रक्षण करो.

(१६) कल्हार, साळीचे कणीस व परशू धारण करणारा, तसेच सुवर्णकांतिमान् आणि तरुण अंगकाठी असलेल्या देवीने ज्याच्या आलिंगनासाठी हात उचलला आहे तो ऊर्ध्व गणेश मला अभयदान करो.

असे हे वेदसाररूप गणेशमूर्तीचे ध्यानप्रद स्तोत्र आहे.

श्री गणेशाला दुर्वा प्रिय का..

     नुकताच श्रावण महिना संपला आहे. पाऊस जरा कमीजास्त झाला असला तरी डोळ्यांना सुखावणारी हिरवळ सर्वत्र आहे. ऊन सावलीचा आणि पावसाचा खेळ सुरु आहे. तशातच मंगलमुर्ती श्री गणेशाचे आगमन झाले आहे. श्रावण आणि भाद्रपदात निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो.

     एरवी वर्षभर सहज उपलब्ध नसणारी विविध प्रकारची फुले, पाने, पत्री आपल्याला मुबलकपणे उपलब्ध होतात. हरतालिकेची पूजा करताना स्त्रिया विविध प्रकारची पत्री पूजेसाठी वापरतात. आणि गणेश चतुर्थीला आपण श्री गणेशाला एकवीस प्रकारची पत्री वाहतो. या प्रत्येक पानाफुलांमध्ये औषधी गुणधर्म दडलेले आहेत.

     आधुनिक जीवनशैलीत आपण निसर्गापासून थोडे दूर गेलो आहोत. त्यामुळे आपल्याला त्याविषयी फारशी माहिती नसते. पण या सणांच्या निमित्ताने ती होते.

     आपल्या पूर्वजांनी किती कल्पकतेने निसर्गाचा आणि या सणांचा सुरेख मेळ घातला आहे. या निमित्ताने आपण निसर्गात जातो, आवश्यक ती पत्री मिळवतो, त्यांची माहिती करून घेतो. शहरातून हल्ली एवढे शक्य नसले तरी बाजारातून का होईना आपण ही पत्री, फुले, पाने, दुर्वा इ. गोष्टी विकत आणतो. या सर्वांमध्ये दुर्वांचे महत्व काही वेगळेच आहे.

     गणपतीला दुर्वा का प्रिय आहेत या संबंधी दोनतीन कथा आहेत. त्या आपण या निमित्ताने पाहू या.

      दुर्वा हे ब्रह्मदेवाच्या कन्येचे नाव. ती अत्यंत सुंदर होती. तिने तपश्चर्या करून गणपतीला प्रसन्न करून घेतले. पण पुढे तिला आपल्या सौंदर्याचा आणि ऐश्वर्याचा गर्व झाला. इतका की ती देवी लक्ष्मीला सुद्धा तुच्छ समजू लागली. तेव्हा तिचा गर्व हरण करण्याच्या उद्देशाने देवीने तिला शाप दिला की पृथ्वीवर तृणरूपाने राहशील. या मुळे दुर्वेला खूपच वाईट वाटले. तिने पुन्हा उग्र तप केले. आणि श्री गणेशाला प्रसन्न करून घेतले. म्हणून गणेशाला दुर्वा प्रिय आहेत.

     दुसरी कथा अशी आहे की, अनलासुर नावाचा एक राक्षस होता. अत्यंत जुलमी आणि अन्यायी. देवांनाही त्याच्यापुढे हार खावी लागत होती. अशा वेळी संकटातून कोण वाचवणार ?

तर विघ्नहर्ता गजानन !

म्हणून सगळे देव गणपतीला शरण गेले. त्यावेळी गणपती बाल रुपात प्रकट झाला. त्याने देवांना मी अनालासुराचा निःपात करतो. तुम्ही निश्चिंत राहा असे आश्वासन दिले.

     बालगणेशाने अनलासुराला युद्धाचे आव्हान दिले. दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले. अनलासुर हा अक्राळविक्राळ, डोळ्यातून अग्निज्वाला बाहेर पडणारा आणि प्रचंड मोठा आवाज असणारा होता. त्याच्या आवाजाने धरणी सुद्धा कंपित होत असे.

त्याने मोठ्या आवेशाने बालगणेशालाच गिळून टाकण्याचा प्रयत्न केला. पण गणेशाने आपल्या दैवी सामर्थ्याने त्यालाच गिळंकृत केले.

अनलासुर ठार झाला. सर्वत्र आनंदीआनंद झाला. देवांनी गणेशाचा जयजयकार केला.

     पण अनलासुराला गिळल्याने गणेशाच्या अंगाचा प्रचंड दाह होऊ लागला. तो शांत करण्यासाठी पार्वतीने त्याला चंदनाचा लेप लावला.

शंकराने त्याच्या मस्तकावर चंद्र ठेवला. म्हणून श्री गणेशाला भालचंद्र हे नाव मिळाले.

तसेच त्याच्या अंगाची आग शांत व्हावी म्हणून आपल्या गळ्यातील नाग त्याच्या कमरेला बांधला.

एवढे करूनही आग कमी होईना.

तेव्हा भगवान विष्णूंनी आपल्याकडील कमळ त्याला दिले. म्हणून त्याला पद्मपाणी हे नाव मिळाले.

वरुणाने पाण्याचा अभिषेक केला.

      या नंतर काही ऋषिगण तेथे आले. त्यांनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची जुडी श्री गणेशाच्या मस्तकावर ठेवली. या उपायामुळे त्याला तत्काळ बरे वाटू लागले, त्याच्या अंगाचा दाह कमी झाला.

म्हणून श्री गणेशाने सांगितले की…

 जो कुणी मला श्रद्धेने दुर्वा अर्पण करील, त्याला हजारो यज्ञांचे आणि तपश्चर्येचे पुण्य प्राप्त होईल.

तीर्थयात्रा आणि दानधर्म केल्याचे पुण्य मिळेल.

 म्हणून आपण श्री गणेशाला दुर्वा वाहतो. दुर्वांमध्ये शीतलता आहे. उष्णतेच्या विकारावर दुर्वांचा रस उपयोगी आहे.

      दुर्वांचे महत्व सांगणारी दुसरी एक कथा आहे. पूर्वी कौंडींण्य ऋषी आपल्या आश्रमात आपली पत्नी आश्रया हिच्यासोबत राहत होते. आपल्या पत्नीला श्री गणेशाची महती सांगताना त्यांनी तिला दुर्वांचे महत्व सांगितले.

     पण ते ऐकून तिला आश्चर्य वाटले. एक प्रकारे तिने अविश्वास प्रकट केला. तेव्हा तिला दुर्वांचे महत्व पटावे म्हणून त्यांनी तिच्या हातात एक दुर्वांची जुडी दिली आणि सांगितले की इंद्राकडे जाऊन तिच्या भाराचे सुवर्ण घेऊन ये.

     आपल्या पतीच्या आदेशानुसार आश्रया इंद्राकडे गेली. आणि तिने आपल्या पतीचा निरोप इंद्राला सांगितला. ते ऐकून इंद्रही विचारात पडला. त्याने आपला सेवक तिच्यासोबत देऊन तिला कुबेराकडे पाठवले. कुबेराने आपल्या परीने प्रयत्न करून पाहिला. त्याच्या भांडारातील सर्व सोने एका पारड्यात टाकले तरी दुर्वांचे पारडे जडच होते. त्याने मग सर्व देवांना पाचारण केले. इंद्र, कुबेर, विष्णू, शंकर आदी सर्व देव पारड्यात बसले तरी दुर्वांचे पारडे जडच होते. यामागे नक्कीच काहीतरी अर्थ असणार ही जाणीव इंद्राला आणि श्री विष्णूला झाली. आणि ते आश्रयासह कौंडीण्य ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी ऋषींनी त्यांना दुर्वांची महती कथन केली आणि सांगितले की गणेश हा त्रैलोक्याचा स्वामी असून त्याच्याहून किंवा त्याने धारण केलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा काहीही श्रेष्ठ नाही.

      श्री गणेशाशी संबंधित असलेल्या सर्व गोष्टी या प्रतिकात्मक आहेत. त्या प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी संदेश आहे.

अनलासुर हा राग, लोभ आदि षड्रिपूंचे प्रतिक आहे. त्याचा नाश गणपतीने केला.

यांचा नाश करण्यासाठी किंवा देवतेला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या करावी लागते.

तपश्चर्या करताना अंगात उष्णता निर्माण होते.

ती उष्णता कमी करण्यासाठी दुर्वांचा उपयोग होतो.

दुर्वा या एकवीस का वाहाव्यात किंवा एकवीस या संख्येचे काय महत्व आहे ? तर पृथ्वीवर सात खंड आहेत. सात समुद्र आहेत. सात वार आहेत. शरीरातही सप्त धातू आहेत. विवाहातही सप्तपदी आहे. आणि सत्व, रज आणि तम हे तीन गुण आहेत. या साताला तीनने गुणले की उत्तर एकवीस येते.

श्री गणेश हा सत्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या पलीकडे असलेले दैवत आहेत. कालही तीन आहेत. वर्तमान, भूत आणि भविष्य. श्री गणेश हा आदिदेव. तो या सगळ्यांच्या पलीकडे. पृथ्वी, आकाश आणि पाताळ हे ही तीन लोक तो व्यापून उरला आहे. मानवी शरीराच्या तीन अवस्था आहेत. जन्म, जरा आणि मृत्यू. अशा या सगळ्या प्रतीकात्मक गोष्टी.

     र्वा या श्रीमंतापासून गरीबांपर्यंत सर्वाना सहज उपलब्ध होतील अशा आहेत. अलीकडे चांदीच्या दुर्वा पण श्री गणेशाला वाहिल्या जातात. पण खऱ्याखुऱ्या दुर्वाच श्री गणेशाला जास्त प्रिय आहेत.

    दुर्वा म्हणजे दिसायला गवत किंवा हरळी. पण त्यांचे महात्म्य मोठे. तेव्हा या गणेशोत्सवात गणपतीला प्रिय असणारे मोदक तर वाहू या, प्रसाद म्हणून भक्षण करू या पण दररोज कमीत कमी एकवीस दुर्वांची एक जुडी आणि प्रिय असणारे जास्वंदीचे फुल तरी श्री गजाननाला भक्तिभावे अर्पण करू या.

Relatetd Post

Comments are closed